नगर : जिल्हा नियोजन समितीच्या मुदत संपलेल्या पाच जागांसाठी आलेले सर्व २५ अर्ज वैध ठरले. ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून (जिल्हा परिषद) एका जागेवर राष्ट्रवादीचे धनराज गाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे.
महापालिका क्षेत्रातून तीन जागांसाठी १८ अर्ज वैध ठरले. लहान निर्वाचन क्षेत्रातील (नगरपालिका) एका जागेसाठी दाखल ६ अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार असले, तरी लढत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच आहे.
जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्हा नियोजनच्या ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून त्यांचे चिरंजीव धनराज गाडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.
मनपा निर्वाचन क्षेत्रात सर्वसाधारण प्रवर्गातून सुभाष लोंढे, ज्ञानेश्वर ऊर्फ अमोल येवले, सागर बोरुडे, सुनील त्रिंबके, अनिल शिंदे आणि मनोज कोतकर यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
महिला सर्वसाधारण प्रवर्गातून मीना चोपडा, ज्योती गाडे (कर्डिले), संध्या पवार, रुपाली वारे, रिजवान शेख, सुनीता कोतकर, आशा कराळे, सोनाली चितळे यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
याच क्षेत्रातील ओबीसी प्रवर्गातून अविनाश घुले, विनीत पाउलबुधे, सुवर्णा जाधव आणि मनोज दुलम यांचेही अर्ज वैध ठरले आहेत. सर्वांचे अर्ज वैध ठरल्यामुळे आता माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोठ्या निर्वाचन क्षेत्रातील निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
लहान निर्वाचन क्षेत्रातून (नगरपालिका) सर्वसाधारण प्रवर्गासाठी सूर्यकांत भुजाडी (राहुरी), गणेश भोस (श्रीगोंदे), मंदार पहाडे (कोपरगाव), शहाजी खेतमाळीस (श्रीगोंदे), आसाराम खेंडके (श्रीगोंदे) आणि रमेश लाढणे (श्रीगोंदे) यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
एका जागेसाठी ६ अर्ज आल्याने येथेही चुरस होण्याची शक्यता आहे. एकट्या श्रीगोंदे तालुक्यातून ४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. शनिवारी (७ डिसेंबर) वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
याच काळात उमेदवारी अर्जासंदर्भात अपील करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. १३ डिसेंबरला वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार असून १६ पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.
येत्या २४ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सैनिक लॉनवर मतदान होणार आहे. २६ डिसेंबरला मतमोजणी होईल.