महापालिकेच्या `बड्या` अधिकाऱ्याच्या दालनात कोरोना पॉझिटिव्ह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-   नगर शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोना रोखण्यासाठी दिवसरात्र काम करणारे कोरोनायोध्येही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

आता थेट महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. आयुक्तांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला व त्यांच्या कुटुंबाला उपचारासाठी कोरोना उपचार केंद्रात दाखल केले आहे. आतापर्यंत महापालिकेच्या दोन कर्मचार्‍यांना यात आपला जीव गमवावा लागला आहे.

एवढे दिवस फिल्डवर काम करणारे अधिकारी, कर्मचार्‍यांना याची भिती होती.मात्र, आता कोरोनाने कार्यालयात काम करणार्‍यांनाही घेरायला सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचार्‍याला व त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हे कर्मचारी आजारी होते. त्यामुळे जवळपास आठ दिवस ते कार्यालयात नव्हते. नंतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यांना महापालिकेने सुरू केलेल्या कोविड उपचार केंद्रात दाखल केले आहे. या घटनेमुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापालिका कर्मचारी युनियनने मागील आठवड्यात ‘वर्क फ्रॉम होम’साठी परवानगी द्यावी म्हणून आंदोलन केले होते. त्यास प्रशासनाने होकार दर्शविला आहे.सोमवारी पुन्हा यासाठी बैठका घेऊन या आठवड्यासाठी ‘वर्क फ्रॉम होम’ची मुदत वाढविण्यात आल्याने कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला आहे.

मात्र ‘वर्क फ्रॉम होम’मुळे महापालिकेची मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोविडसह इतर कामकाजासाठी कर्मचार्‍यांची गरज पडल्यास बोलावून घ्यावे लागत आहे. महापालिकेत इतर कामांसाठी येणार्‍या नागरिकांचीही हेळसांड होत आहे. कर्मचारी कामावर नसल्याने दैनंदीन कामे रखडली आहेत.

कर्मचार्‍यांना कामावर येण्यास भाग पाडले तर कोरोनाची भिती आहे. या प्रकारामुळे महापालिकेला फटका बसत आहे. महापालिकेचे लोकप्रतिनिधी, डॉक्टर, पोलीस, महापालिका कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, सफाई कामगार आदी लोक जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24