अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात लसीकरणाला शनिवारी (दि. १६) सुरुवात झाली होती. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ८७१ जणांचे लसीकरण करण्यात आले.
त्यानंतर दोन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवार आणि बुधवारी पुन्हा लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे.
२१ पैकी सध्या १२ केंद्रांवर लस दिली जात असून, दर दिवशी एका केंद्रावर १०० कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. त्यानुसार बुधवारी १२०० कर्मचाऱ्यांनी लस घेणे आवश्यक होते.
मात्र दिवसाचे निम्मेच उद्दिष्ट पार पडले. लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी, बुधवारी दिवसभरात ६९६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली. पहिल्या दिवशी ८७१ कर्मचाऱ्यांना लस दिली होती.
एका दिवशी बाराशे कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट असताना बुधवारी ते ५० टक्केच पूर्ण झाले. घाबरू जाऊ नका, आरोग्य विभागाचा सल्ला कोणतीही लस अथवा इंजेक्शन दिल्यानंतर हात दुखणे,
किंचित ताप येणे अथवा मळमळणे, आदी सामान्य लक्षणे जाणवतात. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.