स्मशानभूमीत खोदले शेततळे ; पं. स. सदस्यासह सहा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नेवासे : भानस हिवरा येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीत शेततळे खोदल्याने दफन केलेल्या मृतदेहांची हाडे वर आल्याने त्यांची विटंबना झाली. त्यामुळे पंचायत समिती सदस्य किशोर जोजर यांच्यासह सहा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

काही गावगुंडांनी शेततळ्यासाठी पोकलेनने स्मशानभूमीत खोदकाम केले. त्याममुळे काही कबरी उघड्या पडल्या. पुरलेल्या मृतदेहांची हाडे वर आली.

काम रोखण्याचा प्रयत्न केला असता पंचायत समिती सदस्य किशोर जोजार, सयाजी ढवाण, बाबासाहेब ढवाण, रवींद्र भणगे, नंदू जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शुक्रवारी भानस हिवरा गाव बंद ठेवून निषेध करण्यात आला.

या वेळी भानस हिवरा विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयासमोर भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागूल यांचे नेतृत्वाखाली निषेध सभा घेण्यात आली.

भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागूल, राज्याध्यक्ष सुरेशराव आडगळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष साळवे, नितीन दिनकर यांनी मनोगत व्यक्त केले.

गावातील सामंजस्याचे वातावरण भंग होऊ न देता शांतता आणि जातीय सलोखा पाळावा, असे आवाहन भाजप नेते नितीन दिनकर यांनी निषेध सभेत केले. नेवासे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गौतम वावळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24