नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले.
त्या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीपासूनच कर्णधार विराट कोहलीच्या संघाला विश्वचषक स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून अनेकांनी पसंती दिली होती. पण स्पर्धेच्या अंतिम टप्प्यावरच भारतीय संघाला मायदेशी परतावे लागल्यामुळे असंख्य भारतीय क्रीडा शौकिनांना दु:ख झाले.
आपला संघ नेहमीच विजयी ठरावा, असे वाटणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला तर ते अधिकच झाले, कारण त्या बिकट परिस्थितीत आपण संघाला विजयी करू शकलो नाही, ही खंत त्याला आजही जाणवते.
दूरचित्रवाणीवरील एका वाहिनीशी बोलताना भारतीय कर्णधाराने प्रथमच २०१९ मधील विश्वचषकातील पराभवाविषयी आपले मन मोकळे केले. तो म्हणाला, सर्वसामान्यांप्रमाणेच अपयशामुळे माझ्यावरही मोठाच परिणाम झाला.
त्यावेळी झालेल्या भावना व्यक्त करताना कोहलीने सांगितले, न्यूझीलंडविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मी नाबाद राहून संघाला विजयी करेन, असा मला ठाम आत्मविश्वास होता.
आज मात्र विराट कोहलीला तो आत्मविश्वास म्हणजे वैयक्तिक प्रतिष्ठेचा मुद्दा वाटतो. त्याच्या मते तुम्ही अमूक एका खेळाडूवर अवलंबून राहता आणि त्यानुसार सामन्याचे निकाल अपेक्षित कसे काय करू शकता? येथे कोहली म्हणतो, फार तर तुम्ही मोठ्या अपेक्षा करू शकता.
जबरदस्त कामगिरी करण्याची आकांक्षा बाळगू शकता. टीम इंडियाच्या कर्णधाराने खडसावून सांगितले की, पराभवाचा तो नेहमीच तिरस्कार करतो.