जोलिएट : अमेरिकेतील इंडियाना राज्यातील एका डॉक्टरच्या घरामध्ये जवळपास २२४६ अधिक भ्रूणांचे अवशेष सापडल्याने एकच खळबळ उडाली. डॉक्टरच्या घरात भ्रूणांचे अवशेष वैद्यकीय पद्धतीने व्यवस्थितरीत्या ठेवण्यात आले होते. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात या डॉक्टरचा मृत्यू झाला होता. गर्भपात रुग्णालय चालविणारे दिवंगत डॉक्टर उलरिच क्लोफरच्या इलिनोइसस्थित घरामध्ये भ्रूणांचे अवशेष सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. क्लोफर कुटुंबाच्या एका वकिलांनी गुरुवारी त्यांच्या घरामध्ये बाळांचे अवशेष असल्याची शक्यता पोलिसांकडे व्यक्त केली होती.
यानंतर कारवाई करत पोलिसांनी क्लोफरच्या घरातून २२४६ भ्रूणांचे अवशेष जप्त केले. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या घरात शस्त्रक्रियेचे कुठलेही साहित्य आढळले नाही. त्यामुळे डॉक्टरकडून चुकीच्या पद्धतीने गर्भपात केले जात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
३ सप्टेंबर रोजी मृत्यू झालेल्या डॉक्टरचे इंडियानाच्या दक्षिण बेंडमध्ये गर्भपात केंद्र होते; परंतु या केंद्रात चुकीच्या पद्धतीने सर्रास गर्भपात केले जात असल्यावरून २०१५ मध्ये क्लोफरचे रुग्णालय सरकारने बंद केले होते.
रुग्णालयाबाबत दाखल झालेल्या अनेक तक्रारींनंतर इंडियाना आरोग्य विभागाने रुग्णालयाचा परवाना रद्द केला होता. त्यामुळे त्याच्या घरात अवैध पद्धतीने गर्भपात केंद्र सुरू असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.