Ahmednagar News : शहरालगत असलेल्या शिर्डी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर- मनमाड महामार्गावरील हॉटेल वृंदावन येथे २५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून हॉटेलमध्ये येऊन सुनील सिताराम शिंदे (वय ३३, व्यवसाय हॉटेल मॅनेजर, शिर्डी) व त्याचा मित्र ऋषिकेश रवींद्र सागर या दोघांना मारहाण केली.
ऋषिकेश हा भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडला होता. त्याबरोबरच हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकली मोठ्या प्रमाणावर ढकलून देऊन वाहनांचे नुकसान केले, तसेच हॉटेलवर जोरदार दगडफेक करत आर्थिक नुकसान केले.
हॉटेलमध्ये ग्राहक असताना दहशत निर्माण केली. त्यामुळे हॉटेलच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळ नगर- मनमाड महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे साईभक्तांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
मॅनेजर सुनील सिताराम शिंदे (वय ३३, रा. शिर्डी) यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी आरोपी अविनाश तुकाराम भाडाईत (राहणार राहाता), ऋषिकेश विजय पारधे (राहणार शिर्डी),
अजय भाऊसाहेब अहिरे (राहणार निमगाव, शिर्डी) या तिघांच्या विरोधात फिर्याद दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी या तिघांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ५०४ ५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.
शिर्डी पोलिसांनी कठोर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा व हॉटेल व्यवसायिकांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्याकडे निघोज येथील राहाता बाजार समितीचे माजी संचालक शरद मते व काही व्यावसायिकानी केली आहे.
शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरिष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून घटनेप्रंसगी भांडण करत असलेल्या तरुणांचा तपास सीसीटीव्हीच्या आधारे घेण्यात येत आहे.
जर अशा प्रकारे कोणी तरुण हॉटेल व्यावसायिक व्यापारी यांना त्रास देत असतील तर अशा तरुणांची माहिती देण्यासाठी व्यावसायिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.