श्रीगोंदा : आरोपी बंडू उर्फ प्रकाश पोपट चौधरी रा. शिंदे ता. कर्जत जि. अहमदनगर याने शाळेतील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी श्रीगोंद्याचे जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. व्ही.व्ही. भांबर्डे यांनी आरोपीस ३ वर्षे सक्त मजुरी व ५००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
दि. १८ आक्टोबर २०१६ रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी दुपारी दीड वाजता पेपरला जात असतांना आरोपी बंडू उर्फ प्रकाश पोपट चौधरी हा काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून आला व त्याने मुलीचा हात धरून तिला मोटार सायकलवर बसण्याची बळजबरी केली.
तिने नकार देताच तुझ्या आई वडिलांना मारून टाकण्याची धमकी त्याने दिली. धमकीस बळी पडलेल्या पिडीत मुलीस आरोपीने पलसाना ( गुजरात ) येथे नेले. पिडीत मुलीच्या वडिलांनी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला.
या खटल्याचा तपास पो.स.नि.महावीर जाधव यांनी करून आरोपी विरुध्द श्रीगोंदा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही.व्ही. भांबर्डे यांच्या न्यायालयात हा खटला चालला.
एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले.खटल्यातील फिर्यादी व पिडित मुलीची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपीला ३ वर्षे सक्त माजुरी आणि ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.