श्रीरामपूर : वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्यासमोरील जुगार अड्ड्यावर औरंगाबाद येथील पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून सहायक फौजदार हनुमान पालेपवाड याच्यासह पाच जुगाऱ्यांना पकडले.
८ डिसेंबरला रात्री १२ च्या सुमारास औरंगाबाद येथील विशेष पथकातील हवालदार त्र्यंबक बनसोड, पोलिस नाईक योगेश खमाद, कॉन्स्टेबल अभिजित डहाळे, भरत कमोदकर, अपसर बागवान यांना वीरगाव पोलिस ठाण्यासमोर असलेल्या हॉटेलमध्ये काहीजण झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी छापा टाकला असता वीरगाव पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार पालेपवाड याच्यासह भाऊसाहेब नाईक, राहुल आव्हाड, जब्बार शेख, बाळासाहेब बारसे हे पाचजण जुगार खेळताना आढळले.
पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य व मोबाइल असा एकूण ९ हजार ९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.