श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे नगर पुणे रस्त्यावर हॉटेल गुरुकृपासमोर संदिप ज्ञानदेव चौधरी (रा.वाडेगव्हाण ता.पारनेर) व त्यांचे सहकारी संकेत सुरवसे या दोघांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर पिस्तूल रोखत, कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली.
तसेच त्यांच्याकडील गाडीच्या डिक्कीतील ७५ हजार रूपये रोख व ७५ हजारांची सोन्याची चैन असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना (दि.१४ रोजी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
सदर घटनेबाबत संदीप चौधरी यांनी बेलवंडी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश ढोरमले (रा.जातेगाव), गुड्डु उर्फ मोहन झरेकर (रा.म्हसणे),संजय तरटे (रा.पळवे), संतोष दशरथ तरटे (रा.म्हसणे), भाऊ ताराचंद जाधव (रा.पळवे), सुहास सदाशीव शेळके (रा.वाडेगव्हाण), दीप सुभाष ढोरमले (रा, जातेगाव), आनिल फक्कड तरटे (रा,पळवे), योगेश परांडे (रा.घानेगाव ता.पारनेर) या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
याबाबत सविस्तर असे की, दि.१४ रोजी रात्री चौधरी व त्यांचे मित्र संकेत सुरवसे हे गव्हाणेवाडी येथून जात असताना, त्यांच्या गाडीला सदर इसमांनी धडक मारून गाडीचे नुकसान केले. तसेच त्यांच्यावर पिस्तूल रोखत आमच्या विरूद्ध दिलेली फिर्याद काढुन घे, व परत सुपा एमआयडीसीमध्ये येवु नको नाहीतर तुला गोळ्या घालून ठार मारील.
असे धमकावत शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने दांडक्याने मारहान केली. कोयत्याने कापुन टाकु अशी जिवे मारण्याची धमकी देवुन चौधरी यांच्या सोबत असणारे त्यांचे मित्र संकेत सुरवसे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व चौधरी यांच्या गाडीच्या डिकीतील रोख रक्कम असा एकूण दीड लाख रूपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला.
या हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या चौधरी व सुरवसे यांनी तिथून पळ काढला पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बोराडे हे करत आहेत.