वाळूतस्करांकडून नायब तहसीलदारांना धक्काबुक्की; या ठिकाणी घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात वाळू तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच दिवसेंदिवस या वाळू तस्करांची मुजोरी देखील वाढू लागली आहे.

यातच या तस्करांवर कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. नुकतीच पारनेर तालुक्यातील ढवळपुरी शिवारात वाळूवाहतूक करणारा ट्रक नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी पकडला.

तहसील कार्यालयात ट्रक घेऊन येताना, वैभव पाचारणे याने ट्रकला दुचाकी आडवी लावली. नायब तहसीलदार माळवे यांना धक्काबुक्की केली. तसेच साक्षीदार सुनील भाबड यांना शिवीगाळ केली.

याप्रकरणी पारनेर पोलिसांत सात जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. राजू चंद्रकांत पाचारणे, नवनाथ कुटे, प्रीतम कुटे, प्रवीण कुटे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

आरोपींनी माळवे यांचा मोबाईल हिसकावून अंदाजे चार ब्रास वाळू रस्त्यावर खाली करून ट्रक घेऊन भाळवणीच्या दिशेने पळ काढला. याबाबत माहिती मिळताच, तहसीलदार ज्योती देवरे घटनास्थळी गेल्या.

आरोपी विठ्ठल कुटे यास ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, यापूर्वीही अनेकदा अधिकाऱ्यांवर हल्ला होण्याचे प्रकार तालुक्यात घडले आहेत. इतकेच नव्हे, तर तहसीलदारांवर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्नही झाला आहे.

वाळू तस्करांचा सुरु असलेली दादागिरी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्त झालेले मनोज पाटील हे मोडून काढणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24