अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर बेसुमार वाढत असलेली सिमेंटची जंगले (वसाहती), अवैधरित्या होत असलेली वृक्षतोड व मोठया प्रमाणात निर्माण झालेले मोबाईल टॉवर व प्रदूषणामुळे पक्ष्यांनी आपले वास्तव्य बदलले असून, पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी मानवच कारणीभूत आहे.
वेगवेगळ्या कारणांसाठी पक्ष्यांनी सोईनुसार आपली जागा व वास्तव्य बदलले असल्याने सध्याच्या सिमेंटच्या जंगलात पूर्वी ऐकू येणारा पक्षांचा किलबिलाट मात्र थांबला आहे. आज आपल्या परिसरात चिमण्या, कावळे आदी पक्षी दिसून येत नाहीत.
हे पक्षी कुठे मृत पावले नाहीत तर मानवाने निर्माण केलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे, अवैध वृक्षतोडीमुळे व पैशाच्या हव्यासापोटी भरवस्त्यांत उभारलेल्या मोबाईल टॉवामुळे पक्ष्यांनी आपले वास्तव्य बदलले आहे. पूर्वी घरांच्या आसपास दिसणाऱ्या चिमण्यांनी आपला आधिवास बदलला आहे.
पक्ष्यांचा ऱ्हास व मृत्यू थांबविण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून, उपलब्ध असलेली झाडे दीर्घकाळपर्यंत जगवणे हाच यावर उपाय आहे.पक्षी संवर्धन व संरक्षणासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून, त्यांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी केवळ वनखात्याचीच नाही तर त्यात लोकांचासुध्दा सहभाग तेवढाच महत्वाचा आहे.
सामान्यपणे मानवास व शेतीस हानिकारक असणाऱ्या किटकांचा समावेश पक्ष्यांच्या अन्नामध्ये होतो. अनेक प्रजातीचे पक्षी फक्त किटकच खात नाहीत तर त्यांची अंडीही मोठया प्रमाणात फस्त करतात, त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील किटक उदा. अंडी, अळी, कोष, पूर्ण किटक हे पक्ष्यांकडून खाल्ले जातात. त्यामुळे किटकांची संख्या नियंत्रित राखण्यास मदत होते. किटकांची विविधता, त्यांची संख्या व अधाशीपणे खाण्याची सवय हे सर्व अविश्वसनीय आहे.
किटकांचे वाढते प्रमाण व अन्न रुपात वनस्पती भक्षण करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेता किटकांची संख्या ठराविक प्रमाणात नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे व पक्ष्यांमार्फत हे काम निसर्गत: केले जाते. परंतू दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे, सिमेंटच्या जंगलात वावरत असताना प्रतिकारशक्ती कमी असलेल्या पक्ष्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे परीसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या घटत आहे. दरम्यान, पक्ष्यांसाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून ते जगवावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले ज़ात आहे.