ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : DJ वाजविणे पडले महागात, मिरवणुकीतील दोघे ठार, विवाह सोहळा झाला रद्द !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar breaking : नवरदेवाला आदल्या दिवशी विवाहस्थळी पाठविण्यासाठी सुरू असलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या नातेवाईकांना डी.जे.च्या वाहनाने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची

घटना काल गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावात घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील किसन रंगनाथ खताळ यांचा मुलगा बिपीन याचा लग्न सोहळा आज शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे आयोजित करण्यात आला आहे.

दोन्ही कुटुंबियांनी विवाह सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. पारंपारिक पद्धतीने नवरदेवाला लग्नाच्या आदल्या दिवशी विवाहस्थळी पाठवले जाते. याप्रमाणे काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास धांदरफळ गावामध्ये नवरदेवाची वाजतगाजत पाठवणी सुरू होती.

ही मिरवणूक रंगात आलेली असताना धांदरफळ गावातील सोसायटीजवळील उतारावर अचानक डीजेच्या वाहनचालकाचे वाहनावरील (क्र. एमएच १६ एई २०९७) नियंत्रण सुटले. चालकाने ब्रेकवर पाय ठेवण्याऐवजी अॅक्सलेटरवर पाय ठेवल्याने या वाहनाचा अचानक वेग वाढला. हे वाहन थेट मिरवणुकीत घुसले.

या वाहनाने मिरवणुकीत धुंद होऊन बेसावधपणे नाचणाऱ्यांना चिरडले. या अपघातामध्ये दोघा जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. जखमींपैकी एक जण अत्यावस्थ आहे. या अपघातामध्ये बाळासाहेब हरीभाऊ खताळ (वय ४५, रा. धांदरफळ खुर्द) हे वाहनाच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले.

भास्कर राघु खताळ (वय ४७) यांना गंभीर मार लागल्याने तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अभिजीत संतोष ठोंबरे (वय २२), रामनाथ दशरथ काळे (वय ६५), सोनाली बाळासाहेब खताळ (वय ३०), आशा संजय खताळ (वय ५०), गोरक्ष पाटिलबा खताळ (वय ५०), सोपान रावबा खताळ हे सहा जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले.

जखमींपैकी गोरक्ष खताळ व सोपानराव खताळ हे किरकोळ जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर दोघांना घरी पाठवण्यात आले. अचानक झालेल्या या अपघातामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,

पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. या अपघातामधील डीजे हा धांदरफळ येथील गणेश वलवे याचा आहे. अपघातानंतर डीजे चालक फरार झाला आहे. रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

आ. थोरात यांची तातडीची मदत

अपघातातील जखमींना वैद्यकीय मदत करण्याची सूचना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. या सूचनेनंतर आमदार थोरात यांच्या यंत्रणेने तातडीची मदत केली. संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दुर्घटनाग्रस्तांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

जखमींची माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया आमदार थोरात यांनी व्यक्त केली.

विवाह सोहळा स्थगित

या अपघातामुळे धांदरफळ खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. अपघातामध्ये मयत व जखमी झालेले नवरदेवाकडील जवळचे नातेवाईक आहेत. अपघातानंतर नवरदेव विपीन याला घरी पाठवण्यात आले. या प्रकारानंतर आज रणखांब येथे होणारा लग्नसोहळा स्थगित करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office