अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले : आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्याकडे आदिवासी विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक भांगरे यांनी त्याला दुजोरा दिला.
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीशी गद्दारी करत भाजपत प्रवेश केला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली भांगरे यांनी पिचड यांच्या विरोधात स्वतः चार पावले मागे येऊन डाॅ. लहामटे यांना उमेदवारी देत एकास एक उमेदवार उभा केला.
जनतेने लहामटे यांना १ लाख १३ हजार मते देत पिचड पिता-पुत्रांना पराभवाची धुळ चारली. मंत्रिमंडळ विस्तारात आमदार डाॅ. लहामटे यांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.
अकोल्यात रखडलेल्या कामांचा निपटारा ठाकरे सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे. पिचड पिता-पुत्रांकडून अपमानकारक वागणूक दिली जात असल्याची तक्रार त्यांचेच निष्ठावान कार्यकर्ते करू लागले आहेत.
अकोल्यात विखुरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम उभारणी करण्याची गरज आहे. त्यासाठी आमदार डाॅ. लहामटे यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास ते आदिवासी समाजाच्या विकासासाठी चांगले काम करून दाखवतील, अशी अपेक्षा भांगरे यांनी व्यक्त केली.