निकालाला अवघे काही तास राहिले आहे त्यामुळे आता सर्वांच्या नजरा २३ मे कडे लागल्या आहेत.
चौकाचौकात, पारा पारावर, बाजारामध्ये, चहाच्या टपरीवर जिथे कुठे माणसं भेटतील, त्या प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा..
दक्षिणेत काय होईल कोण असेल दक्षिणेचा खासदार, सुजय विखे की संग्राम जगताप?
मागील तीन वर्षांपासून सुजय विखे यांनी जंग जंग पछाडले होते. डाॅ. सुजय विखे हे आपण नगर दक्षिण मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे ठासून सांगत होते.
त्याच बरोबर शरद पवार ही जागा काँग्रेससाठी सोडणार असल्याची त्यांना खात्री होती. पण राष्ट्रवादी ने ही जागा सोडलीच नाही. आणि ते निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झाले.
याच वेळी शरद पवार काय गुगली टाकणार ? या कडे सर्वांचे लक्ष लागले असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेस कडून तोडीस तोड म्हणून आमदार संग्राम जगताप या तरुण आमदाराला उमेदवारी दिली.
साहजिकच दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने रणांगण अधिकच तापले. ही लढत शरद पवार आणि राधाकृष्ण् विखे यांच्यातच असल्याचे चित्र माध्यमांकडून रंगवण्यात आले. या मुले साहजिकच आता कोण निवडून येणार, याबाबतची उत्सुकता सिगेला पोचली आहे.
या लढती मध्ये खा दिलीप गांधी आणि आमदार शिवाजी कर्डीले नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते.
कारण खा दिलीप गांधी यांचे नाकारलेले तिकीट आणि मोदींच्या सभेत त्यांचा झालेला अपमान. या मुळे नाराज झालेले खा दिलीप गांधी नेमकी काय भूमिका घेणार आहेत याबाबतची उत्सुकता शीगेला पोचली होती.
तसेच नगर चे किंग मेकर आमदार शिवाजी कर्डीले भाजपा चे विद्यमान आमदार तसेच राष्ट्रवादी चे उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे.
आ शिवाजी कर्डीले नेमके काय करणार जावई संग्राम ला मदत करणार की पक्ष्याशी एकनिष्ठ राहून सुजय यांचे काम करणार ?
सुजय विखे यांच्या भाजपतील उमेदवारीमुळे पक्षातील जुनेजाणते निष्ठावंत कार्यकर्ते आणि पक्षाच्या विचारधारेचा म्हणून जो काही मतदार दक्षिणेमध्ये आहे, त्यांच्यामध्ये नक्कीच काहीसा असंतोष होता.
तसेच खा गांधी यांना तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेले भाजपा कार्यकर्ते प्रचारात जास्त सक्रिय नव्हते. या उलट भाजप मधील दुसरा आगरकर गट मात्र सक्रिय झाला. याच बरोबर भाजप मध्ये काँग्रेस चे विखे समर्थक सामील झाले.
पण आता भाजपा मधील जुने आणि सुजय विखे समर्थक यांची सांगड डॉ विखे यांना घालण्यात यश आले का ? त्याच बरोबर खा गांधी यांना आपल्याकडे वळवण्यात कितपत यश आले हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
इकडे राष्ट्रवादी मध्ये मात्र सर्व नेते आपापसातील मतभेद विसरून राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे राहिले.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः नगर मध्ये येऊन मोठ बांधली. या वेळी काँग्रेसचा थोरात गट मात्र संग्राम जगताप यांच्यात मागे उभा राहिला. आघाडीची मोठी ताकद संग्राम जगताप यांच्या बरोबर होती.
विधानसभेनुसार मतांची गोळाबेरीज
नगर शहर : विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे अनिल राठोड आणि भाजप चे अभय आगरकर यांचा पराभव केला होता. त्या मुळे नगर शहरातून संग्राम जगताप चांगले मताधिक्य मिळावे म्हणून मोट बांधली होती तर नगर शहरातून जगताप यांना मताधिक्य मिळू द्यायचे नाही म्हणून अनिल राठोड आणि अभय आगरकर यांनी संग्राम यांच्या विरोधात जंग जंग पछाडले.
राहुरी :- राहुरी तालुक्यात प्रसाद तनपुरे, स्व. शिवाजीराजे गाडे, धुमाळ पाटील आदी सर्वांनी एकत्र येत संग्राम जगताप यांना साथ दिली तर आ. बाळासाहेब थोरात यांनी जाणिवपूर्वक लक्ष घालून विखे विरोधकांची मोट बांधली आहेत. मात्र सुजय विखे यांच्या पाठी आ. शिवाजी कर्डीले यांनी आपली सर्व ताकद उभी केली होती. पण शिवाजी कर्डीले यांचे जावाई संग्राम जगताप असल्याने कर्डीले यांनी किती जोर लावला आहे त्यावर राहुरीचे गणित अवलंबून आहे.
पाथर्डी – शेवगाव : शिवाजीराव काकडे आणि हर्षदाताई काकडे या यांच्या मुळे शेवगाव तालुक्यात संग्राम जगताप यांना मोठी ताकद मिळाली. वंजारा समाजाची मते पाथर्डीत निर्णायक ठरणार आहे याशिवाय आ मोनिका राजळे यांनी सुजय विखे यांना चांगल्या प्रकारे समर्थन केले आहे.
श्रीगोंदा : श्रीगोंदा हा तसा जगताप यांचा स्वत:चा तालुकाच! या तालुक्यात मोठे पुढारी एकत्र आले की तालुक्यातील मतदार दुसराच निर्णय घेतात हा इतिहास आहे आणि या निवडणुकीतही तसेच झालेले दिसल्यास आश्चर्य वाटू नये. विखे पाटलांसाठी बबनराव पाचपुते व त्यांच्या समर्थकांनी कंबर कसलेली दिसत असताना दुसरीकडे जगताप यांच्यासारी नागवडे, आ. जगताप यांनीही प्रतिष्ठा लावली आहे.
पारनेर :-पारनेरमध्ये शिवसेनेचे आ विजय औटी यांच्या कामांमुळे त्यांच्या बरोबर मोठा वर्ग आहे पण सेनेतून बाजूला असा प्रारंभीचे चित्र विखे यांच्या बाजूने होते. मात्र, प्रत्यक्षात तसे शेवटच्या क्षणी जाणवले नाही. या मतदारसंघात विखे पाटलांचा प्रारंभीपासून असणारा थेट संपर्कच त्यांना मताधिक्य देऊ शकतो. मात्र, राष्ट्रवादीचे सारे गटतट एकसंघ राहिल्यास त्यात अडसर येऊ शकतो.
कर्जत जामखेड : कर्जत जामखेड मध्ये शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी थेट लक्ष घातले होते या मुळे पालकमंत्री राम शिंदे यांच्या अस्थित्वाची लढाई होती . कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे यांच्याविरुद्ध नराजाचा सूर आहे. याचा तोटा नक्की विखेंना किती बसतो ? यावर सगळे गणित अवलंबून आहे. तसेच आ अरुण जगताप यांनी सुद्धा इकडे जास्त लक्ष दिले होते.