अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- आयुर्वेदिक उपचारांची जोड मिळाल्याने १४०० रुग्ण कोरोनावर मात करू शकले. विशेष म्हणजे शासनाकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळाले नसताना नगरमधील वैद्यांनी उपचारांत सातत्य राखून महाराष्ट्रात सर्वाधिक चांगली कामगिरी केली.
आयुष मंत्रालय, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, नोडल ऑफिसर डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा आयुष व जिल्हा साथनियंत्रण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी दिलेली परवानगी व आयुष टास्क फोर्सने दिलेल्या
निर्देशानुसार आयुर्वेद व्यासपीठ, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन व प्रभा आयुर्वेद फाउंडेशन, महाराष्ट्र या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णांवर १८ जूनपासून बूथ हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदिक उपचार सुरू आहेेत. सामाजिक बांधिलकी जोपासत स्वतःला होऊ शकणाऱ्या संसर्गाचा धोका पत्करून, नि:स्वार्थी, निरपेक्ष भावनेने व सेवाभावी वृत्तीने हे काम सुरू आहे.
महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम :- १८ जूनपासून सुरू झालेला हा उपक्रम सलग ७५ दिवस अखंड सुरू आहे. आतापर्यंत १४०० रुग्णांना आयुर्वेदिक उपचार करण्यात आले. संघटनांचे वैद्य व दानशूर व्यक्ती मिळून औषधांचा खर्च करत आहेत. या वैद्यांना सरकारकडून किंवा अन्य कोणाकडूनही मानधन दिले जात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे.
आयुर्वेद आपण जीवनशैली म्हणून स्वीकारायला हवे :- या उपक्रमात डॉ. महेश मुळे, डॉ. मंदार भणगे, डॉ. अंशू मुळे, डॉ. रंजना मुनोत, डॉ. आनंद नांदेडकर, डॉ. शौनक मिरीकर, डॉ. ज्योती चोपडे, डॉ. महेंद्र शिंदे, डॉ. विलास जाधव, डॉ. मंगेश काळे, डॉ. श्रुती माळी, डॉ. राहुल काजवे, डॉ. धनश्री धर्म, डॉ. मैत्रेयी लिमये व डॉ. विश्वनाथ काळे हे सर्वजण तन-मन-धनाने सहभागी झाले आहेत. भविष्यातही कोरोनासारख्या महामारीला सक्षमपणे सामोरे जायचे असेल, तर आपले प्राचीन भारतीय वैद्यक आयुर्वेद आपण जीवनशैली म्हणून स्वीकारायला हवे, असे या वैद्यांनी सांगितले.
औषधांचे सकारात्मक परिणाम, उत्साहात वाढ :- आयुर्वेदिक औषधांचे सकारात्मक परिणाम दिसून आले. ताप, कोरडा खोकला, सर्दी, घसा दुखणे, थंडी वाजून येणे, अंग खूप दुखणे, श्वास घेण्यास त्रास, दम लागणे, अतिशय थकवा वाटणे, जुलाब होणे, वास न येणे, अन्नाची चव न कळणे, भूक न लागणे, नैराश्य, प्रचंड भीतीमुळे झोप न लागणे ही लक्षणे खूप लवकर कमी होऊ लागली. खूप उत्साह जाणवत असल्याचे रुग्णांनी सांगितले. मनातील भीती, नैराश्य कमी होऊन या रुग्णांना शांत झोप लागत आहे.
नियमित समुपदेशन :- औषधांबरोबरच रुग्णांचे नियमित समुपदेशन केले जाते. मनोबल उत्तम राहावे व त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मकता यावी, यासाठी त्यांना उत्तम वाचन, ध्यान, योगासने, योग्य व्यायाम या विषयी माहिती दिली जाते. शारीरिक, मानसिक आरोग्य व प्रतिकारशक्ती उत्तम राहावी यासाठी आयुर्वेदातील अग्नी, आहार, विहार, दिनचर्या, ऋतुचर्या, पंचकर्म उपचार, रसायन चिकित्सा यांची माहिती दिली जाते. विचारांमध्ये सकारात्मकता निर्माण झाल्याने प्रकृतीत वेगाने सुधारणा होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved