ह्या कारणामुळे झाला व्यापारी गाैतम हिरण ह्यांचा मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  व्यापारी गाैतम हिरण यांचा मृत्यू डोक्याला मार लागून झाला आहे, हे उत्तरिय तपासणीत समोर आले आहे. या प्रकरणात एकूण चाळीस ते पंचेचाळीस संशयितांची चाैकशी करण्यात आली आहे.

याप्रकरणात हिरण यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी सबळ पुराव्याच्या आधारे सागर गंगावणे व बीट्टू उर्फ रावजी वायकर या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१ मार्च राेजी सायंकाळी गौतम हिरण यांचे अपहरण झाले होते. त्यानंतर रविवारी (७ मार्च) त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एमआयडीसी शिवारात आढळून आला.

त्यानंतर मात्र बेलापूर ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांचा संताप अनावर झाला होता. पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिस अधीक्षक पाटील स्वतः दोन दिवस श्रीरामपुरात तळ ठोकून होते. सबळ पुरावा मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपी ताब्यात घेतले.

याबाबत सोमवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक राहुल मदने, निरीक्षक संजय सानप आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, हिरण यांची हत्या अपहरणाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर रविवारी मृतदेह आणून टाकला, तोपर्यंत मृतदेह कोठे लपवला होता याचाही पोलीस शोध घेत आहेत.

या गुन्ह्याचा तपास थोडा क्लिस्ट आहे मात्र गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाणार आहोत. दोन्हीही आरोपी श्रीरामपुरातील आहेत. त्यांना परिसरातूनच ताब्यात घेण्यात आले आहेत. या आरोपींवर यापूर्वीचे विविध गुन्हे दाखल आहेत.अशा आरोपींच्या व टोळ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे

.पोलिसांनी तीन मोकाचे प्रस्ताव तयार केले आहेत. कोणत्याही गुन्ह्यात आरोपी पकडल्यानंतर योग्य कलम लावणे हीच प्रतिबंधक कारवाई आहे. असे झाले नाही तर गुन्हेगारी फोफावते. दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व पोलिसांची गय केली जाणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24