अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलच्या प्रकरणी त्रिस्तरीय समिती स्थापन करून त्याच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी गटशिक्षण अधिकार्यांना दिला आहे.
शाळेतील विद्यार्थिनींचे पालक वैभव भोराडे व इतर पालकांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन चौकशी होणार आहे. वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूल ही शैक्षणिक संस्था आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच शाळा बंद असून, सध्या शाळेच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाते.
मात्र शाळेकडून इतर ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली अवाजवी फी ची मागणी केली जात असल्याबाबत पालकांनी आक्षेप घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाबरोबर पालकांचा शालेय वाढीव फी संबधी संघर्ष सुरू आहे.
सर्व फी नाही भरल्यास ऑनलाईन शिक्षण बंद करु असा इशारा शालेय प्रशासनाने पालकांना दिला होता. याप्रकरणी शाळेतील पालकांनी आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते.
दरम्यान या तक्रारीवरून शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी नगर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना एक पत्र पाठवून त्रिस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या चौकशीचा अहवाल कार्यालयास सादर करावा असे आदेशात नमूद केले आहे.
त्यामुळे आता शाळेसमोर चौकशीचा भुंगा लागणार असून, या चौकशीमध्ये काय निष्पन्न होते याकडे पालक वर्गाचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved