ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : शासकीय जागेत केलेले अतिक्रमण सिद्ध ! गडाखांचे सदस्यत्व रद्द

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील उपसरपंच गणेश बाळू गडाख यांच्या एकत्रित कुटुंबाने शासकीय जागेत केलेले अतिक्रमण सिद्ध झाले आहे.

त्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे.

त्यामुळे गणेश बाळू गडाख हे उपसरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरले असून एकत्रित कुटुंबाने केलेले अतिक्रमण त्यांना भोवले आहे. संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक ग्रामपंचायतच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी घेतलेल्या निवडणूकीत गणेश बाळू गडाख हे प्रभाग दोन मधून सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून निवडून आले होते.

मात्र, गणेश गडाख यांची आई शोभा बाळू गडाख यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करून त्यावर त्यांचा बेकायदेशीर ताबा असल्याने त्यांच्याविरुद्ध संजय गडाख यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता.

सदर प्रकरणाची जिल्हाधिकारी सालीमठ यांच्यासमोर सुनावणी झाली. अर्जदार संजय गडाख यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गणेश बाळू गडाख यांच्या आईचे शासकीय मिळकतीत अतिक्रमण असल्याचे कागदपत्रावरून दिसून येत असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी गडाख यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द ठरविण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत संगमनेरचे तहसीलदार आणि संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना कळविण्यात आले आहे. सदर आदेशाविरुद्ध नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे १५ दिवसाच्या आत अपील दाखल करण्यास मुदत देण्यात आली आहे.

अर्जदार संजय गडाख यांच्यातर्फे अॅड. स्वप्नील काकड यांनी काम पाहिले. एकत्रित कुटुंबाने केलेले अतिक्रमण सिद्ध झाले असून गणेश बाळू गडाख यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office