अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- मकाचे दर घसरले असताना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्यास सुरुवात केली होती.
मात्र, मका खरेदी करण्याची मुदत संपल्यामुळे अजूनही बहुतांश शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून ही मका शासकीय दराने खरेदी केली जावी, यासाठी मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी,
अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठवलेल्या निवेदनात केली. यावर्षी समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन वाढले.
यामध्ये मका पिकाचा देखील समावेश असून मकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले. मात्र, मकाचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले असताना शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे शेतकऱ्यांना मकाचे योग्य दर मिळत होते. मात्र, मका खरेदी करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात येत असलेली मका खरेदी बंद करण्यात आली.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या मकाविक्री करणे अद्याप बाकी आहे. त्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यासाठी मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार काळे यांनी अन्न नागरी पुरवठामंत्री भुजबळ व सहकारमंत्री यांच्याकडे केली.