जामखेड: सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती, परतीच्या पावसामुळे पाण्याखाली गेलेली पिकं यामुळे अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली असलेल्या तालुक्यातील सरदवाडी येथील अप्पासाहेब रावसाहेब गंभिरे (वय ४८) या शेतकऱ्याने कुसडगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या मुळे परिसरात शोककळा पसरली. अप्पासाहेब गंभिरे हे गुरुवारी जामखेडवरून सरदवाडी येथे दुपारी घरी गेले होते. आपला मोबाइल घराबाहेर ठेवला व बाहेर गेले. मात्र, सायंकाळ झाली तरी ते घरी आले नाहीत म्हणून घरातील व वाडीतील लोक त्यांना शोधू लागले, तरीही कुठेही ते सापडले नाहीत.
६ रोजी दुपारी कुसडगाव शिवारात एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते दिसले. गावातील पोलिस पाटील, नीलेश वाघ यांनी पोलिसांना कळवले व नंतर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
अप्पासाहेब गंभिरे यांच्या नावावर नऊ एकर जमीन आहे. सततचा दुष्काळ नापिकीला ते कंटाळले होते. तसेच त्यांच्यावर सोसायटीचे देखील सव्वा लाख रुपये कर्ज होते.
पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या आईचे वृध्दापकाळाने निधन झाले होते. यातच घरातील कर्त्या माणसाने आत्महत्या केल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.
त्यांच्यामागे पत्नी, एक विवाहित मुलगी व मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस नाईक एच. डी. भागवत हे करत आहेत.