राजुरा : मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या विहीरगाव उपक्षेत्रातील मूर्ती वनबिटात बैल चराईसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीहरी साळवे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
विहीरगाव उपवनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मूर्ती वनबिटालगतच्या शेतशिवारात श्रीहरी साळवे हे बैल चराईसाठी गेले होते. त्याचवेळी दडून बसलेल्या वाघाने श्रीहरी साळवे यांच्यावर हल्ला केला.
यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. उल्लेखनीय म्हणजे याच परिसरात वावर असणाऱ्या वाघाने चुनाळा शेतशिवारात ७ ते ८ जनावरांना फस्त केल्याच्या घटना घडल्या होत्या.
यावेळी शेतकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे वनविभागाकडे केली होती. पण वनविभागाने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने वाघाचा विहीरगाव, मूर्ती, चनाखा, चुनाळा, नलफडी शेतशिवारात वावर वाढला आहे.
वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला, याला वनविभाग जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केला आहे. या वाघाला त्वरित जेरबंद करण्याची मागणी सुदर्शन निमकर यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.