श्रीगोंदे फॅक्टरी येथील सावकारांच्या जाचाला कंटाळून मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या तरुणाने बुधवारी विषप्राशन केले. त्याचा शनिवारी मृत्यू झाला.
दत्ता गणपत सुतार (वय ३५) हा तरुण शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करत होता. काही सावकारांकडून त्याने आठवड्याला १० टक्के दराने कर्ज घेतले होते.
अव्वाच्या सव्वा दराने कर्ज घेतल्यामुळे त्याला ते फेडता येत नव्हते. सावकार दारात येऊन त्याला मारहाणीची धमकी देऊन शिवीगाळ करत असत.
या प्रकारामुळे मागील काही दिवस तो तणावात होता. सावकारांचा त्रास असह्य झाल्याने त्याने बुधवारी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले.
कुटुंबीयांनी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार चालू असताना शनिवारी रात्री एकच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
त्याच्या पाठीमागे पत्नी, नऊ वर्षांचा मुलगा व सहा वर्षाची मुलगी आहे.