पाथर्डी : राज्यात बळीराजाचे सरकार आले असून, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून दिलासा देण्याचे काम करणार असून, कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथील जि. प. प्रा. शाळेत मिरी -करंजी गटातील प्राथमिक शाळांच्या वतीने आयोजित बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानावरून प्रा. गाडे बोलत होते. प्रमुख मान्यवर म्हणून जि.प. सदस्या प्रभावती ढाकणे,
शिवसेना गटनेते अनिलराव कराळे , शिवसेना नेते रफिक शेख, नगर तालुका पं.स.चे सभापती प्रवीण कोकाटे, शिक्षण विस्ताराधिकारी अभयकुमार वाव्हळ, माणिकराव लोंढे, शंकरराव वाघ, सरपंच रामनाथ शिरसाट, भाऊसाहेब पोटे, अशोकराव दहातोंडे, महादेव गीते,बापूसाहेब घोरपडे, बापूसाहेब गोरे, उपसरपंच संजय गोरे, सुरेश घोरपडे, शिवाजी घोरपडे, पोपटराव आव्हाड,
सुभाष गवळी, डॉ. गोरख गीते, रंगनाथ वांढेकर, युवानेते भागिनाथ गवळी, हणुमंत घोरपडे, गणेश तुपे, अरुणराव झाडे, सतीश जाधव यांच्यासह शाळेचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मेळाव्यात सहभागी झाले होते.
या वेळी रांगोळी, भाषा, कला, विज्ञान, गणित या दालनांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बालानंद मेळाव्यात मान्यवरांनी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या फळभाज्यांची खरेदी केली. स्वच्छता अभियान, प्रदूषणाचा भस्मासुर, ्त्रिरयांवरील अत्याचार, याविषयावर विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले.
या वेळी प्रा. गाडे म्हणाले, विद्यार्थ्यांना बालवयातच शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञान मिळणे महत्त्वाचे आहे. राज्यात बळीराजाचे राज्य आले असून, विद्यार्थ्यांच्या पालकांनी खचून न जाता कष्ट करण्याची जिद्द समोर ठेवत कुटुंबाला धाडसाने पुढे घेऊन जावे.
आत्महत्या हा कुठल्याही गोष्टीवर पर्याय ठरू शकत नाही, त्यामुळे मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करून शेतकऱ्यांनी कणखर भूमिका घ्यावी. राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघातील प्रा. शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करण्यासाठी ना. प्राजक्त तनपुरे निश्चित पाठीशी राहतील, असे माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे म्हणाल्या. पाथर्डी तालुक्यातील मिरी -करंजी परिसराने नेहमीच ढाकणे कुटुंबासोबत राहून त्यांना पाठबळ दिल्यामुळे या पूर्व भागाला ढाकणे कुटुंब कधीही विसरणार नाही, असे जि.प. सदस्या प्रभावती ढाकणे म्हणाल्या.