अहमदनगर लाईव्ह 24 टीम:- उड्डाणपुलासाठी संरक्षण खात्याची जागा हस्तांतरित करताना नॅशनल हायवे अॅथोरिटीने काही नवीन नियम घातले आहेत. त्या माध्यमातून ते उड्डाणपुलाच्या कामात नाहक आडकाठी घालत आहेत.
जर त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही, तर मी खासदार या नात्याने थेट दिल्ली येथील त्याच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा खा. डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
दरम्यान के. के. रेंज लष्कराच्या जागे संदर्भात शेतकर्यांचा विषय समजून घेऊन तो केंद्र सरकारच्या दरबारी मांडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खा. डॉ. विखे बुधवारी आले होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नगर शहरातील उड्डाणपूल व्हावा, यासाठी मी गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे. या कामात काही प्रमाणात लष्कराची जागा येत आहे.
ही जागा उड्डाणपुलाच्या कामात आवश्यक आहे. या जागेचे मूल्यांकन झाले आहे. लष्कराची जागा ही प्रथम महापालिकेला हस्तांतरित होईल. त्यानंतर ती महापालिकेकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरीत केली जाईल.
या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने उड्डाणपुलाला विलंब होत आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपुलासाठी आवश्यक असणार्या एकूण जागेपैकी प्रत्यक्षात 95 टक्के भूसंपादन झाले असताना देखील काम सुरू करण्याची भूमिका घेतली नाही.
उलट लष्कराचा विषय मार्गी लावा, असे म्हणत ते सातत्याने आडकाठी घालत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांना उड्डाणपुलाचे काम सुरू करा, अशी विनंती करणार आहे.
त्यानंतरही त्यांनी निर्णय न घेतल्यास थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकार्यांच्या विरोधात दिल्ली येथे उपोषणाला बसणार आहे. जनतेचा प्रश्न मार्गी लावणे महत्त्वाचे असून त्यासाठी ही भूमिका घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.