Ahmednagar Breaking : समृद्धीवर कारचा भीषण अपघात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते शिर्डी टप्प्यात सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात काल गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कारचा भीषण अपघात घडला.

या अपघातात कारमधील दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असून ते श्रीरामपूर येथील रहिवासी आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी श्रीकांत थोरात हे चालक हर्षल भोसले यांच्यासोबत स्विफ्ट डिझायर कार क्रमांक (एम. एच. १४ ई. वाय ७९९८) मधून इगतपुरी येथील भरवीर इंटरचेंज वरून समृद्धी महामार्गावर शिर्डीच्या दिशेने जात होते.

काल गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कारचा अपघात झाला. तीन ते चार पलट्या खात ही कार दुभाजकाच्या साईड बॅरिकेट्सला धडकून दोन्ही लेनच्या मधोमध जाऊन पडली. किलोमीटर क्रमांक ५६० वर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर गोंदे इंटरचेंज येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे मदत पथक तातडीने अपघातस्थळी रवाना झाले.

अपघाताची माहिती समजल्यावर वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी शैलेश शेलार, देविदास माळी हे देखील अपघातस्थळी पोहोचले. कारमधील दोघा जखमींना बाहेर काढत टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेतून सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले.

मात्र तेथे पोहोचणे पूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांना अपघातग्रस्त कारमध्ये एक लाख साठ हजार रुपये रोकड आढळून आली. ही रक्कम ताब्यात घेतल्याचे वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी शैलेश शेलार यांनी सांगितले. ही रक्कम थोरात की, भोसले यांची होती. याबाबत खातरजमा करून घेतल्यावर ती संबंधितांच्या नातेवाईकांकडे देण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.