अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीगोंदे :- बोरिवली येथून श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे रुग्णाला घरी सोडवण्यासाठी घेऊन जात असताना शिक्रापूर येथील वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका अडवली. एका पोलिसाने चालकाच्या वडिलांना काठीने मारहाण केली.
या व्यक्तीचा काही अंतर पुढे गेल्यानंतर मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास उरसे टोलनाक्यावर घडली. नरेश शिंदे (वय ४९, ठाणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नरेश यांचा मुलगा निलेश शिंदे यांनी ही माहिती दिली.
शिंदे यांची रुग्णवाहिका ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. ते गुरुवारी रात्री एका रुग्णाला घेऊन बोरिवली येथून श्रीगोंदे येथे निघाले होते. दुपारी रुग्णवाहिका मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर आली.
तिथे थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी निलेश यांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर एका वाहतूक पोलिसाने नरेश यांच्या पाठीत जोरात काठी मारली. दुस-या वाहतूक पोलिसाने नरेश यांना तुम्ही प्रवासी घेऊन जात असल्याचे म्हणत एका अधिका-याकडे नेऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
पोलिसांनी त्यांना प्रवासी वाहून नेत असल्याचे म्हणत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे निलेश यांनी सांगितले. त्यानंतर निलेश रुग्णवाहिका घेऊन चाकणच्या दिशेने गेले. चाकणच्या पुढे गेल्यानंतर शारीरिक त्रास होत, नरेश यांनी जीभ बाहेर काढून मान टाकली.
वडिलांना त्रास होत असल्याने निलेश यांनी काही रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयांनी दाखल करून घेतले नाही. शेवटी शिक्रापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com