अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- संगमनेर शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या तसेच शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या फ्लेक्स बोर्डबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कारवाई सुरू केली.
संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातून जाणाऱ्या नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला राज्यातील हायटेक बसस्थानक उभारले आहे.
सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या या बसस्थानकाच्या परिसरात लागलेल्या अनेक लहानमोठ्या फ्लेक्सच्या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याची बाब थोरात यांना जाणवली.
बसस्थानकावर थांबून त्यांनी स्वतःचे छायाचित्र असलेला फलक हटविला. वाढत्या विद्रुपीकरणाला हटवण्यासाठी महसूलमंत्र्यांनी खुद्द पुढाकार घेतला. दरम्यान शहरातील गणेशनगर, सह्याद्री कॉलेज,
नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग, नवीन नगर रोड, दिल्ली नाका या सर्व ठिकाणी लावलेले फलक आगामी दोन दिवसात काढून टाकण्यात येणार आहेत. तसेच नगरपरिषदेच्या सशुल्क परवानगी शिवाय फलक लावण्यास बंदी घालण्यात येणार आहे.