अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात १७ नोव्हेंबरला झालेल्या अपघातात जखमी झालेल्या बालकामगाराचा पुण्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल होऊन मृताच्या कुटुंबास नुकसान भरपाई मिळण्याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी कामगार आयुक्त, साखर आयुक्तांकडे, तसेच आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे.
त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवांनी आयुक्त, कामगार आयुक्तालय आणि संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांना तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करुन तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
श्रीगोंदे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करुन मृताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संभाजी ब्रिगेड कामगार आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा भोस यांनी दिला आहे.