नवी दिल्ली : राजधानीत अनाज मंडी भागात एका चार मजली इमारतीतील अवैध फॅक्टरीला रविवारी पहाटे आग लागली. आगीचे लोळ आणि प्लास्टिकच्या विषारी वायूमुळे ४३ जणांचा मृत्यू झाला.
बहुतांश मृत्यू गुदमरून झाले आहेत. पोलिसांनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. बहुतांश मृत कामगार बिहारचे आहेत. आग लागली तेव्हा ते गाढ झोपेत होते. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे.
६२ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दिल्ली सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकी २ लाख, भाजपने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
बिहार सरकारने १ लाखाची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, फॅक्टरीचा मालक रेहान व पार्टनर फुरकान यांना पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेतले. दिल्लीत १३ जून १९९७ रोजी उपहार सिनेमागृहात भीषण आग लागून ५९ लोकांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची जबाबदारी ना केजरीवाल सरकार घेत आहे, ना भाजपशासित महापालिका; ही फॅक्टरी विनापरवाना चालत होती, एकेका खोलीत २५-३० मजूर होते.