Breaking : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पारनेर व सुपे पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकांना यश आले आहे. नगर-कल्याण मार्गावरील धोत्रे (ता. पारनेर) शिवारात रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
दरोडेखोरांमध्ये दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. संजय हातण्या भोसले (वाघुंडे, पारनेर), अक्षय उंबऱ्या काळे (सुरेगाव, श्रीगोंदे), एक अल्पवयीन मुलगा, तसेच सुंगरीबाई गणेश भोसले (सुरेगाव, श्रीगदि), मनीषा संजय भोसले (वाघुंडे, पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी वेशांतर करून ही कारवाई केली.
नगर-कल्याण मार्गावर धोत्रे (पारनेर) शिवारात रविवारी (३ नोव्हेंबर) पाच जण संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली. त्यांनी पारनेर व सुपे पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चार पथके पाठवली.
शेतकरी, तसेच मेंढपाळांची वेशभूषा केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगर-कल्याण मार्गावर धोत्रे शिवारात पायनीचा तलाव परिसरात दाट झाडीत दरोड्याच्या तयारीत, दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला चारही बाजूंनी घेरले.
पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस व दरोडेखोरांमध्ये झटापट झाली. मात्र, त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. आरोपींकडून चाकू, सुताची दोरी, मिरची पूड व चार मोटारसायकली,
असा १ लाख ८६ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. प्रवाशांना लुटण्याच्या इराद्याने दरोडेखोर दबा धरून बसले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.