Breaking News : अवैध मार्गाने भारतात घुसखोरी करून थेट नगरमध्ये आलेल्या चार बांगलादेशी घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकाने पकडले आहे. हे चारहीजण नगर दौंड रोडवर खंडाळा गावच्या शिवारात असलेल्या एका स्टोन क्रेशरवर काम करत होते.
त्यांच्याकडे बनावट पासपोर्ट, बनावट आधार कार्ड आणि त्या आधारे घेतलेले मोबाईल सीम कार्ड आढळून आले आहेत. या चौघांसह त्यांना घुसखोरीला मदत करणारे, बनावट पासपोर्ट, बनावट आधार कार्ड तयार करून देणारे एजंट अशा १० जणांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक आणि नगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.मोहीउद्दीन शेख, शहाबुद्दीन जहाँगीर खान, दिलावर सिराजउल्ला खान, शहापरान जहाँगीर खान अशी पकडण्यात आलेल्या घुसखोरांची नावे आहेत. हे चौघे जण खंडाळा येथील शिवशक्ती स्टोन क्रेशर येथे काम करत होते व तेथेच असलेल्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करत होते.
दहशत विरोधी पथकाच्या नाशिक येथील युनिटला बुधवारी याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सचिन खैरनार, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप गिरी, पोलिस अंमलदार वडकते, तांबोळी, मोरे, प्रदीप गागरे यांनी तातडीने नगरमध्ये येवून नगरच्या दहशतवाद विरोधी पथकातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जाकीर शेख, राकेश खेडकर, पोलिस अंमलदार गोरे, संजय हराळे यांना बरोबर घेवून ही कारवाई केली.
सदरचे घुसखोर हे बांगला देशातील बेरोजगारीला कंटाळून चोरट्या मार्गाने पायी चालत पश्चिम बंगाल येथे आले. तेथून रेल्वेने कल्याण येथे गेले. तेथे काही दिवस काम केल्यावर ते नगरमध्ये आले होते. अशी माहिती त्यांनी दहशतवाद विरोधी पथकाला दिली आहे.