ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात ! एकाचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Braking : श्रीरामपूर येथील नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रीज परिसरामध्ये काल सोमवारी (दि. १५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की काल सोमवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूरकडून नेवासा रोडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगात काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीने (क्रमांक एमएच २० सीडब्ल्यू ७५७८) श्रीरामपूरच्या दिशेने जाणाऱ्या निपाणी वडगाव येथील व्यक्तीस जोराची धडक दिली.

यामध्ये युनूस अब्दुल सय्यद (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. ते एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. डोक्याला जबर मार लागला असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी चारचाकी वाहनचालक कांबळे हा हरेगाव फाटा येथील रहिवासी आहे. अपघात घडताच श्रीरामपूरकडील अनेक नागरिक या वाहनाचा पाठलाग करत या ठिकाणी आले. या वाहन चालकाने पळून जात असताना काही प्रवाशांना धडक दिल्याचे समजले.

त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस नाईक किरण टेकाळे, पो.कॉ. प्रवीण कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत वाहतूक सुरळीत करत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मयत व्यक्तीस शवविच्छेदनासाठी येथील कामगार हॉस्पिटलमध्ये हलविले.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील आडवे झालेले चारचाकी वाहन बाजूला घेण्यात आले. पोलीस हवालदार संतोष परदेशी यांनी वाहन चालकास ताब्यात घेतले. स्थानिक नागरिकांनी परिसरात गतिरोधक तसेच ओव्हर ब्रिजपर्यंत डिव्हायडर बसवण्याची मागणी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office