अहमदनगर शहरातील त्या कॉंग्रेस नेत्याची गच्छंती !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- गेल्या काही दिवसांपासून नगर शहर काँग्रेसमध्ये थोरात समर्थकांमध्येच काळे व भुजबळ असे दोन गट झाल्याचे स्पष्ट दिसू लागले होते.

भुजबळ गटाने मकर संक्रांतीनिमित्त घेतलेल्या तीळगुळ वाटप कार्यक्रमात भुजबळ यांना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

मात्र विद्यमान शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांना हटविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचे प्रमुख बाळासाहेब भुजबळ यांनाच काँग्रेसने घरचा रस्ता दाखविला आहे.

त्यांचे शहर ब्लॉक अध्यक्षपद गेले असून त्यांच्या जागी मनोज गुंदेचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.

दोनच दिवसांपूर्वी भुजबळ यांनी काळे यांच्या विरोधात मोहिमेचे रणशिंग फुंकले होते. एसीसीचे मेंबर तथा प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या साक्षीने किरण काळे यांच्यावर टिकेचा भडीमार करण्यात आला.

किरण काळे यांची गच्छंती होते की काय?अशी चर्चा रंगली असतानाच भुजबळ यांनाच घराचा रस्ता दाखविणारा आदेश आज मुंबईतून निघाला.

भुजबळ यांची शहर ब्लॉक कमिटीच्या अध्यक्ष पदावरील उचलबांगडी म्हणजे विनायक देशुमख यांनाही चपराक मानली जात आहे.

मनोज गुंदेचा यांची वर्णी लावून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारत पक्षांतर्गत विरोधकांना धोबीपछाड दिल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

अहमदनगर लाईव्ह 24