Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये गॅंगवार ! गोळीबार..मारहाण..एकाचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : शेवगाव गेवराई रस्त्यावर गोळीबार व मारहाणीचा प्रकार घडला. ही घटना रविवारी घडली होती. यातील मारहाण करण्यात आलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अर्जुन पवार (रा. पुसद, जि.यवतमाळ), असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी राजेश गणेश राठोड (रा. बजरंगनगर, ता पुसद, जि. यवतमाळ) याच्या फिर्यादीवरून सुरेश उर्फ पिन्या कापसेसह १० ते १२ अनोळखी व्यक्तींवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दुपारी शहरातील गेवराई रस्त्यावरील तळणी फाट्याजवळ स्वामी समर्थ रसवंती गृहासमोर काळ्यारंगाच्या स्कार्पिओमध्ये बसलेल्या पिन्या ऊर्फ सुरेश कापसे याच्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणापैकी एकाने गोळीबार केला. त्यात कोणासही इजा झाली नाही; मात्र त्यानंतर पळून गेलेल्या गोळीबार करणारांचा पाठलाग करत कापसे याने त्यांचा दुचाकीला स्कार्पिओने मागून धडक दिली. त्यानंतर त्यांना गेवराई रस्त्यावरील बाभूळगाव फाट्यानजीक मारहाण करण्यात आली.

यामध्ये दुचाकीवरील एक जण व स्वतः कापसे असे दोघेही जखमी झाले होते व पोलिसांनी दोघांना उपचारासाठी अहमदनगर व पुणे येथे दाखल केले. त्यातील अर्जुन पवारचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत राजेश राठोड याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, अन्वर (पूर्ण नाव माहिती नाही) याने यवतमाळ येथून राजेश व मला शेवगाव येथे एका कामानिमित्त बोलावून घेतले. त्यानंतर पाथर्डी येथील संदीप पवारच्या शेडमध्ये जाऊन मुक्काम केला. रविवारी पवारने पिन्या कापसे याचा फोटा दाखवला.

दोन गावठी कट्टे व तीन कोयते घेऊन दोन दुचाकीवर पाच जण शेवगाव येथे आले. पिन्या कापसे याचे लोकेशन घेऊन गेवराई रस्त्यावर घटनास्थळी आलो. तेथे कापसे याची खात्री करून डी. के (पूर्ण नाव माहीत नाही) याने पिस्तूल काढून दोन राउंड कापसे याच्या दिशेने फायर केले. त्यामध्ये कापसे बचावला. नंतर गेवराई रस्त्याच्या दिशेने पळालो. त्यावेळी कापसे व त्याच्या साथीदाराने काळ्या रंगाच्या स्कार्पिओने आमचा पाठलाग केला. एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेने रस्त्यावर पडल्यानंतर त्याच्या इतर १० ते १२ साथीदारांनी आम्हाला जबर मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये अर्जुन पवार हा जबर जखमी झाला होता. या झटापटीत कापसे हाही जखमी झाला असून, त्याला अहमदनगरला उपचारासाठी दाखल केले तर पवार यास पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले होते.

त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गुन्हेगारी घटनेमुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, पिन्या कापसेने केलेल्या मारहाणीतील जखमीचे आज मृत्यू झाल्याने त्याच्या विरोधात काल दाखल झालेल्या गुन्ह्याच्या कलमात वाढ करण्यात येणार आहे. तर कापसे याच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तींवरही आज (मंगळवारी) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.