कांदा उत्पादकांना अच्छे दिन ! ‘या’ कारणामुळे भाव वाढले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवार दि. 18 रोजी झालेल्या लिलावामध्ये 80 रुपये प्रति किलो भाव कांद्याला मिळाला असल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड व उपसभापती विलास झावरे यांनी दिली आहे.

प्रथम प्रतीच्या कांद्याला 6500 ते 7500, द्वितीय प्रतीच्या कांद्याला 5500 ते 6400, तिसर्‍या प्रतीच्या कांद्याला 4000 ते 5400, चौथ्या 2500 ते 3900 व पाचव्या 1000 ते 2400 असा क्विंटलला बाजारभाव मिळाला. सध्या कांद्याचा तुटवडा निर्यात बंद असली तरी देशांतर्गत जाणवत आहे त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे देशांतर्गत कांद्याला मागणी वाढल्याने बाजार भावामध्ये वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात नाशिक परिसरामध्ये जास्त प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते मात्र यावर्षी तेथील कांदाही पावसामुळे खराब झाला आहे.

राज्यातील इतरही भागातील कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारामध्ये जुना कांदा येत आहे. या कांद्याला चांगला दर मिळत आहे. काही शेतकर्‍यांनी उन्हाळी कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला होता. त्याने सध्या काजळी पकडली आहे.

हवामानामुळे तो खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे, मात्र त्यातील चांगल्या प्रतीच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील नवीन लागवड झालेला कांदा अनियमित हवामान व संततधार पावसामुळे खराब झाला आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये बाजारामध्ये कांदा उपलब्ध होणार नाही तसेच जो कांदा उपलब्ध होईल तो कमी प्रमाणात असणार आहे. हवामान व पावसामुळे उत्पन्नात मोठी घट निर्माण झाली आहे. नवीन कांदा बाजारात कधी उपलब्ध होईल हेही अजून निश्चित नाही, त्यामुळे येत्या काही दिवसात कांदा भाव खाणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24