अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात ग्रामपंचायत कर्मचार्यांमधून 10 टक्के नोकर भरतीसाठी पात्र असतानाही डावलून अपात्र कर्मचार्यास नियुक्त केल्याच्या निषेधार्थ न्याय मिळण्यासाठी संजय डमाळे या ग्रामपंचायत कर्मचार्याने जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण केले.
तर ही भरती प्रक्रिया सदोष झाली असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. या उपोषणात संघटनेचे सरचिटणीस कॉ.अॅड. सुधीर टोकेकर, एकनाथ वखरे, बाळासाहेब मगर, धोंडीभाऊ सातपुते आदी सहभागी झाले होते.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायत कर्मचार्यांमधून 10 टक्के नोकरभरतीसाठी पात्र असताना तसेच सेवाजेष्ठता यादीमध्ये 47 क्रमांकाचा नंबर असताना भरती प्रक्रियेत बाद ठरवून, अपात्र कर्मचार्याची नियुक्ती केली असल्याचा आरोप डमाळ यांनी केला आहे. 1 सप्टेंबर रोजी यादी प्रसिद्ध करणे हे संशयास्पद असून, वास्तविक 31 डिसेंबर 2018 पर्यंत जे कर्मचारी 10 टक्के सेवाजेष्ठतेस पात्र आहेत त्यांचीच निवड करून निवड यादी मध्ये नाव घेणे आवश्यक होते. तसेच 1 जानेवारी 2019 रोजीच्या यादीसाठी जे कागदपत्र दाखल झालेले आहेत ते ग्राह्य धरून निवड प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.
मात्र नंतरुन दाखल केलेले कागदपत्र ग्राह्य धरून अपात्र कर्मचार्यास पात्र करून त्यांची निवड करणे नियमांना डावलून असल्याने पात्र लाभार्थींवर अन्याय झाला असल्याचे डमाळ यांनी निवेदनात सांगितले आहे. तर सुधीर टोकेकर यांनी जाहीर करण्यात आलेली यादी सदोष असून, अनेक पात्र कर्मचार्यांना डावलण्यात आले असल्याचे सांगितले.