भिशीच्या व्यवहारात अडकलेल्या त्याची प्रकृती चिंताजनक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- संगमनेर मध्ये कायदेशीर मान्यता नसतानाही शहरात भिशी व्यवसाय खुलेआम सुरू आहे.

यातच शहरातील एका भिशीमध्ये अडकलेले कोट्यवधी रुपये वसूल होत नसल्याने भिशी चालकाने विषारी पदार्थ सेवन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न करणार्‍या भिशीचालकाची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

दरम्यान सध्या संगमनेर शहरात भिशी एकमेकांच्या विश्वासावर हा व्यवसाय सुरू असून सामान्य नागरीकांपासून मोठ्या व्यापार्‍यांपर्यंत यात सहभागी आहेत. 5 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत भिशी लावण्यात येत आहे.

दरम्यान भिशीच्या या व्यवहारातून अनेक भिशीचालक मालामाल झाले आहेत. मात्र दुसरीकडे याच बेकायदेशीर भिशी व्यवसायामुळे अनेकजण अडचणीत आले आहेत.

भिशीमध्ये अडकलेले कोट्यवधी रुपये वसूल होत नसल्याने त्रस्त झालेल्या शहरातील सय्यदबाबा चौकातील एका भिशीचालकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

या व्यक्तीला रूगनलायत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान भिशी चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच संबंधित रुग्णालयाचा मेमो प्राप्त होऊनही पोलिसांनी याची अद्याप गंभीर दखल घेतली नाही. भिशी चालकाने आरोप केलेल्या 14 जणांवर कारवाई का केली जात नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भिशी चालकाची सुसाईड नोट :- आपण भिशीत सहभागी झालेल्या परंतु पैसे परत न देणार्‍या 14 जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहोत, असे या भिशी चालकाने आपल्या चिठ्ठीत लिहून ठेवलेले आहे. त्याने या 14 जणांवर थेट आरोप करुनही पोलिसांनी अद्याप त्यांच्याविरुध्द कारवाईचे कोणतेही पाऊल उचललेले नाही.

संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर भिशी व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायातून मोठी आर्थिक कमाई होत असल्याने शहरातील अनेक बडे प्रस्त या व्यवसायात सहभागी झाले आहेत. आजी-माजी नगरसेवकही मोठ्या प्रमाणात भिशी चालवत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24