Ahmadnagar breaking : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात मुलीला पळवून नेण्यास मदत करणाऱ्या काही आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे. आता याच गुन्ह्यात एका होमगार्ड कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी विश्वास संतोष मकासरे (वय २० वर्षे, रा. संक्रापूर) याच्यावर अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासादरम्यान पीडीत मुलीला लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा, या उद्देशाने आरोपी विश्वास मकासरे याला होमगार्ड कर्मचारी रमेश भास्कर मकासरे (वय २६ वर्षे, रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी) याने मदत केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर त्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गरजे, पोलीस हवालदार शेळके, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, यादव, गायकवाड, वैराळ, बडे यांच्या पथकाने काल दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी ताब्यात घेऊन गजाआड केले.
त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पीडित मुलीला व आरोपी विश्वास संतोष मकासरे या दोघांना धुळे जिल्ह्यात पाठवले असल्याची माहिती दिली. त्यानंतर मुलगी व आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेळके, नदीम पठाण यांचे पथक धुळे जिल्ह्यात रवाना झाले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण करीत आहेत.