अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- संगमनेर शहरातील ईस्लामपुरा, कुरण रोड, बीलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, तसेच कुरण (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून
व सदरच्या क्षेत्राच्या मध्यबिंदु पासुन जवळपास 2 कि.मी चा परिसर हा कोअर एरिया म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घोषित केला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी शनिवार, दिनांक ०९ मे रोजी सकाळी ०६ वाजेपासून ते दि.२२ मे, २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.
त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
संगमनेर शहरातील कुरण रोड परिसर आणि मौजे धांदरफळ बु.ता.संगमनेर येथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्ती आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला आहे.
या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर क्षेत्रातून वाहनांचे आवागमन या आदेशा द्वारे प्रतिबंधीत करण्यात आले आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
1. सार्वजनिक ध्वनिक्षेपक द्वारे आदेश उद्घोषित करण्यात यावा.
2. कंट्रोल रुम स्थापन करुन 24 x 7 कार्यरत ठेवावी. सदर ठिकाणी 3 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येवून प्रत्येक शिफ्टमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्द करण्यात यावेत.
3. कंट्रोल रुम मध्ये रजिस्टर ठेवून त्यामध्ये नोंदी घेण्यात याव्यात व नागरीकांना आवश्यक त्या जिवनावश्यक वस्तु सशुल्क पुरविण्यात याव्यात. तसेच प्राप्त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात यावे.
4. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणा-या बाबी जसे दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी योग्य ते शुल्क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात याव्यात. त्याकामी जिवनावश्यक वस्तुंचे व्हेंडर निश्चित करुन, पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्यादी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे.
5. संगमनेर शहरातील ईस्लामपुरा, कुरण रोड, बीलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, तसेच कुरण (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, संगमनेर हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.
6. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकींग सुविधा बँक प्रतिनिधी मार्फत उपलब्ध करुन द्याव्यात.
7. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्ते बंद करुन एकच रस्ता बॅरिकेड्स द्वारे खुला ठेवावा.
8. सदर क्षेत्रामध्ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना संबंधीत सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत.
9. वर नमुद प्रतिबंधीत भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरीकांच्या हालचालींवर निर्बंध आणने आवश्यक ठरले आहे. त्यामुळे सदर भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्थापनांकडून देण्यात आलेल्या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्यात येत आहे.
10. वर नमुद क्षेत्रातील इतरत्र कर्तव्यार्थ असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्याच्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास, अश्या व्यक्तींची त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्याची सुविधा संबंधीत आस्थापनांनी उपलब्ध करुन दयावी. जेणेकरुन कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्यांच्या हालचालींवर निर्बध घालणे शक्य होईल, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®