रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात राज्यात प्रचंड विकास कामे झाली आहेत, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केला आहे.
विकास कामांच्या जोरावरच झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमत प्राप्त करेल, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
झारखंडची राजधानी रांची येथे पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत नितीन गडकरी यांनी म्हटले की, विकास कामे आणि रोजगारनिर्मिती या मुद्यांवर भाजप झारखंड विधानसभा निवडणूक लढवीत आहे. मागील काळात राज्यात भाजपच्या सरकारने व्यापक पातळीवर विकासकामे केली आहेत.
यासोबतच स्वयंरोजगारावरही भाजपने विशेष भर दिला आहे. जवळपास चार वर्षांच्या कार्यकाळात झारखंडमध्ये तब्बल ३४ लाख लोकांना नोकऱ्या देण्यात यश आले, असे त्यांनी ठासून सांगितले. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी राज्यात १ लाख तरुणांना रोजगार प्रदान केला आहे.
यात प्रामुख्याने ९५ टक्के लाभधारक हे स्थानिक आहेत. या शिवाय झारखंडमध्ये ५० हजार शासकीय नोकरभरतीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे, असेही गडकरींनी पुढे बोलताना नमूद केले. दरम्यान, झारखंडच्या जनतेला विविध केंद्रीय योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आला आहे.