नवी दिल्ली : ‘माझा राजकारणात येण्याचा विचारही नव्हता; पण आज मी राजकारणाचा एक भाग असून, जनतेची कामे करण्यासाठी मी माझे सर्वश्रेष्ठ प्रयत्न करत आहे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’द्वारे ‘एनसीसी’ कॅडेट्सशी संवाद साधला. त्यात एका विद्याथ्र्याने त्यांना ‘तुम्ही राजकारणात आले नसते तर काय झाले असते? असा प्रश्न केला. त्यावर मोदींनी आपला राजकारणात येण्याचा विचारही नव्हता, असे स्पष्ट केले. ‘प्रत्येक मूल आपल्या जीवनात अनेक टप्प्यांतून जाते. त्यामुळे हा एक अवघड प्रश्न आहे.
कुणाची हे बनण्याची इच्छा असते तर कुणाची ते बनण्याची इच्छा असते; पण खरे सांगायचे तर राजकारणात येण्याची माझी कोणतीच इच्छा नव्हती. मी तसा विचारही केला नव्हता; पण आज मी एक राजकारणी आहे.
देशाचे कल्याण कसे करता येईल, यावर माझा सतत विचार सुरू असतो. मी स्वत:ला याच कामात वाहून घेतले आहे,’ असे ते म्हणाले.