अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी – साईजन्मभूमीबाबत उकरून काढण्यात आलेल्या वादावर शिर्डीकर आक्रमक झाले असून बेमुदत शिर्डी बंदच्या माध्यमातून तीव्र विरोध सुरू केला आहे. मध्यरात्रीच शिर्डीकरांचा बंद सुरू झाला आहे.
पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी नाहीच, यावर ठाम भूमिका घेत शनिवारच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी चार ठरावही संमत केले आहेत. दरम्यान, ग्रामसभेत नेते व ग्रामस्थांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत या वादाबाबात तीव्र नापसंती व्यक्त केली.
शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने शनिवारी सायंकाळी सहा वाजता द्वारकामाई समोर ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेचे अध्यक्षपदी सुधाकर शिंदे होते तर शिर्डी ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
देशविदेशात हजारो साईमंदिरे उभी राहिली आहेत. पाथरी मंदिर त्याचाच एक भाग आहे. ब्रिटिशांनी सुद्धा सगळं शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काही मिळाले नाही. शिर्डी ग्रामस्थांची भूमिका कोणा विरोधात नाही, विनाकारण जन्मस्थळाचा मुद्दा उपस्थित करणार्या प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो. शासनाने या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी. असे आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.