अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-नगर शहराला मुळाधरणावरून पाणीपुरवठा करणारी योजनेला सुमारे ४५ वर्षे झाली असल्यामुळे या योजनेला अनेक ठिकाणी पाणी गळती होत आहे.
त्याचबरोबर नगर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असून मोठी लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी केंद्र सरकारच्यावतीने शहरातील अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी फेज २ पाणी योजनेचा निधी उपलब्ध झाला होता.
त्याचबरोबर अमृत पाणी योजनेतून मुळाधरणातून वसंत टेकडी पर्यंत नवीन पाणी योजनेला मंजुरी मिळाली. पाणी साठवण टाक्यांना मंजुरी मिळाली असून ते काम पूर्ण झाले आहे. परंतु मुळा धरण ते वसंत टेकडी दरम्यान पाईप टाकण्याच्या कामाला अनेक शेतकऱ्यांनी व व्यावसायिकांनी विरोध केला आहे.
यासाठी आज प्रत्यक्षात मुळा धरण ते विळद पंपींग स्टेशनपर्यंत सर्व शेतकऱ्यांची व व्यावसायिकांची समजूत काढण्यात आली आहे व ठेकेदाराला या भागामध्ये जलद गतीने पार्डप टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. या कामामध्ये कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस संरक्षणात हे काम केले जाईल, असा इशारा खा. सुजय विखे यांनी दिला.
मुळा धरण ते विळद पंपींग स्टेशन दरम्यानच्या अमृत पाणी योजनेच्या कामाची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,नगर शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. कोणी एका व्यक्तीच्या आडमुठेपणामुळे या योजनेचे काम थांबविले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाचा पंचनाम्यानुसार मोबदला दिला आहे.
राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर मोबदला दिला जाईल. या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील ४0 वर्षे नगर शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.