महत्वाची बातमी : प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील नागरिकांना कळविण्यात येते की, दिनांक 13 ऑक्‍टोबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 404 क्युसेक, जायकवाडी धरणातुन 9432 क्‍युसेक, मुळा धरणातुन 600 क्‍युसेक, सीना धरणातुन सीना नदीस 364 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.

भीमा नदी दौंड पुल येथे 3,882 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अहमदनगर तसेच नाशिक व पुणे जिल्ह्यात पावसामुळे व धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रवारा, गोदावरी, भीमा आणि सीना या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्या काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. तसेच पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र पासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. जुनाट/ मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भुसखलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.

धरण व नदी क्षेत्रांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याचा प्रवाहामध्ये उतरू नये. अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जीवितास धोका उद्भवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्रमांक 1077 (टोल फ्री) 0241-232844, 2356940 वर संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24