अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत सध्या राज्यभर सुरू असलेल्या हनीट्रॅप चर्चेबाबत भाष्य करण्यास नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी अनुत्सुकता दाखवली.
एखाद्याच्या व्यक्तिगत विषयावर टिपणी योग्य नसल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात खा. डॉ. विखे शुक्रवारी दुपारी आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत सुरू असलेल्या वादावर बोलताना खा. विखे म्हणाले, मुंडे यांच्याबाबतीत भाजपची पक्ष म्हणून वेगळी भूमिका असेल, आमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्याही वेगवेगळ्या प्रतिक्रिया असू शकतात.
मात्र, एक व्यक्ती म्हणून माझे मत वेगळे आहे. भाजपचा सदस्य नव्हे, खासदारही नव्हे तर व्यक्ती म्हणून मला असे वाटते की, एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींवर भाष्य करणे मला संयुक्तिक वाटत नाही.
मला जे व्यक्तिस्वातंत्र्य आहे, त्याआधारे मी एवढेच सांगतो की त्यावर टीकाटिपण्णी करणे योग्य नाही, असे भाष्य करून खा. विखेंनी याविषयावर पुढे फारसे बोलणे टाळले.