या ठिकाणी केली मुस्लिम युवकाच्या हस्ते श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- यंदा हिंदूंचा गणेशोत्सव व मुस्लिम समाजाचा मोहरम हे दोन महत्वाचे व मोठे सण एकाच वेळेस आले आहेत.

या काळात हिंदू मुस्लीम समाजात जातीय सलोखा राहावा यासाठी चौपाटी कारंजा मित्रमंडळाच्यावतीने शनिवारी सायंकाळी मुस्लीम युवकाच्या हस्ते गणेशाची छोटीशी मिरवणूक काढण्यात आली.

चौपाटी कारंजा चौकातील श्री दत्त मंदिरात कोणताही जल्लोष न करता साध्या पद्धतीने पर्यावरण पूरक नैसर्गिक रंग व शाडूमातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तीची प्रतिस्थापना केली. मंडळाचे अध्यक्ष अमोल भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जातीय सलोख्याचा उपक्रम राबवण्यात आला.

मंडळाच्या या उपक्रमाचे व सध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. मंडळाचे कार्यकर्ते अक्रम पठाण यांनी श्री गणेशाची मूर्ती हातात घेऊन गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत मंडळाच्या ठराविक कार्यकर्त्यांनी छोटीशी मिरवणूक काढली.

चौपाटी कारंजा चौकातील श्री दत्त मंदिरात मंदिराचे पुजारी श्री. गोरेगावकर यांच्या हस्ते विधिवत श्री गणेशाची प्रतिस्थापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे महेश कुलकर्णी म्हणाले, चौपाटी कारंजा मित्रमंडळ दरवर्षी कोणत्याही सार्वजनिक वर्गणीशिवाय मोठ्या उत्साहात व जल्लोषात गणेशोत्सव साजरा करत जनजागृतीच्या विषयावर देखावा सादर करत असतो.

मात्र यावर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीने हा उत्सव आम्ही खंड न पडता साजरा करत आहोत. गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही सण एकाच वेळेस आल्याने हिंदू मुस्लीम समाजाच्या जातीय सलोख्याचे प्रतिक म्हणून मंडळाचे युवा कार्यकर्ते अक्रम पठाण यांनी उत्साहात गणेशाची मूर्ती हातात घेऊन

मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावर्षी कोणताही देखावा सादर न करता गणेशोत्सवाच्या १२ दिवसांच्या काळात कोरोनाग्रस्तांसाठी साखळी पध्द्तीने मंडळाचे सर्व कार्यकर्ते जनकल्याण रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणार असल्याचे ते म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24