वॉशिंग्टन : लैंगिक अत्याचार केल्यानंतर एका १९ वर्षीय भारतीय अमेरिकन विद्यार्थिनीची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या क्रूर घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेतील नराधमास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मूळची हैदराबादची असलेल्या रुथ जॉर्जचे इलिनॉयस विद्यापीठात शिक्षण सुरू होते. मात्र, शनिवारी रुथचा मृतदेह कुटुंबाच्या एका गाडीत सापडल्याने एकच खळबळ उडाली. तपासामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. सोबतच तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून २६ वर्षीय हल्लेखोर डोनाल्ड थर्मन याला रविवारी शिकागो मेट्रो स्टेशनजवळून ताब्यात घेतले. हल्लेखोर हा विद्यापीठाशी संबंधित नसल्याचे सांगण्यात आले आहे.
शुक्रवारी रुथसोबत संपर्क होत नसल्याने तिच्या कुटुंबाने विद्यापीठ पोलिसांकडे धाव घेतली होती. हल्लेखोराने आपला गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू माइकल डी. एमिरिडिस यांनी रुथच्या निधनावर संवेदना व्यक्त केल्या आहेत.