नगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला जाण्याची शक्यता आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर महाराजांच्या “त्या” कीर्तनाची चौकशी सुरू झाली आहे.
यासाठी मुंबई येथे प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तपत्रातील वृत्ताचा आधार आणि ऑनलाइन प्रसिद्ध झालेल्या चित्रफितीचा आधार घेतला जात आहे. या वृत्तपत्राला पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने पत्र लिहून महाराजांच्या “त्या” कीर्तनासंदर्भात पुरावे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबी कर यांनी दिली.
डॉ. मुरंबीकर म्हणाले, “वृत्त प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्राला पत्र पाठवले आहे. त्यांच्याकडून महाराजांच्या “त्या” कीर्तनाचे पुरावे मागितले आहेत. हे पुरावे पीसीपीएनडीटी समितीकडे येताच ते सायबर सेलकडून तपासून घेण्यात येतील. “त्या” कीर्तनात महाराजांचा खरंच आवाज आहे का, कुणी डबिंग केले आहे, ही संपूर्ण चौकशी झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल.”
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या झालेल्या प्रत्येक कीर्तनाचा व्हिडिओ हा ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येतात. ‘संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’, अशीव वेळेला संग झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात, असे विधान इंदुरीकर यांनी केले आहे.
हा व्हिडीओ ऑनलाइन आहे. या संदर्भात एका वृत्तवाहिनीने यावर वृत्त देखील प्रसिद्ध केले आहे. या वृत्ताची दखल अहमदनगरमधील पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आली. या बैठकीमध्ये इंदुरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केले का? यावर चर्चा झाली.
यासंदर्भात पुरावे सादर होताच तातडीने पुढील कार्यवाही होईल. परंतु इंदुरीकर महाराज यांना याबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा सादर करण्याचा सूचना दिल्या नाहीत. परंतु पुराव्यांमध्ये काही आढळल्यास पुढील कार्यवाही करू, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी स्पष्ट केले.