अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच आता काही ठिकाणी जनावरांनाही लम्पी स्कीन डिसीजच्या आजाराने ग्रासले असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
परंतु या संक्रमणाची वेळीच दखल घेवून पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास १०० टक्के धोका टळू शकतो, असे आवाहन गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले.
परजणे पाटील म्हणाले, लम्पी स्कीन आजार हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना होणारा विषाणुजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणुमुळे हा आजार बळावतो.
देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरे या आजाराला लवकर बळी पडतात. दमट वातावरणामध्ये किटकांची मोठी वाढ होते. त्या दरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो.विषेशतः चावणाऱ्या माशा, डास, गोचीड, वेगवेगळे किटक यांच्यामुळे या रोगाचा संसर्ग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापर्यंत पोहोचतो.
रोगांचे जनावरांवर होणारे दुष्परिणाम
लम्पी रोगामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात मोठी घट होते. गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होण्याची अधिक शक्यता असते. संक्रमण झाल्यानंतर किमान दोन आठवड्यापर्यंत ते जनावरांच्या रक्तामध्ये राहते. मग शरीराच्या इतर भागात त्याचे संक्रमण होत जाते. लसिका ग्रंथींना सूज येते.
एक आठवडाभर भरपूर ताप येतो. त्वचेवर हळूहळू 10 ते 15 मि. मी. व्यासाच्या गाठी तयार होतात.लम्पी स्कीन हा आजार झुनोटीक रोग प्रकारातील नसल्याने जनावरांपासून माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे पशुपालकांनी या आजाराला मुळीच घाबरुन न जाता आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून जनावरांना औषधोपचार करुन घ्यावा,
या गोष्टींची काळजी घ्या:
जनावरांचे गोठे मुक्त व स्वच्छ ठेवावेत, किटक प्रतिबंधक औषधांची वेळच्यावेळी फवारणी करावी, बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून दूर ठेवावे अशा उपाययोजना वेळच्यावेळी केल्यास रोगाचा संसर्ग टाळण्यास चांगली मदत होऊ शकते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved